शाळा तपासते पालकांचेही प्रगतिपुस्तक
पुणे - भविष्यातील (किंबहुना आजचा) सुजाण नागरिक म्हणून विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते. हा सुजाण नागरिक घडविण्यात शाळेचा जेवढा वाटा असतो, तेवढाच पालकांचाही. पालक, पाल्य आणि शाळा यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठी पनवेलमधील "आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके' विद्यालयाने "पालकांचे प्रगतिपुस्तक' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेणाऱ्या पालकांचा विद्यार्थ्यांच्या सकारात्मक जडणघडणीतील सहभाग तपासता यावा, हा हेतू या उपक्रमामागे आहे.