चंदेरी झळाळीत महालक्ष्मीचा रथोत्सव
कोल्हापूर - रांगोळी, फुलांच्या पायघड्यांनी सजलेले रस्ते... आतषबाजीने उजळून निघालेला सारा आसमंत... वाद्यांचा टिपेला पोचलेला सूर आणि अंबामातेचा गजर करत सारे लोटलेले शहर अशा चैतन्यदायी वातावरणात आज श्री महालक्ष्मीची चांदीच्या रथातून नगरप्रदक्षिणा पार पडली. तब्बल साडेचारशे किलो चांदीतून साकारलेल्या रथातून यंदा पहिल्यांदाच झालेला हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. रात्री नऊपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला नगरप्रदक्षिणेचा मार्ग रात्र वाढेल तसा फुलतच राहिला.