"प्रभू रामचंद्र की जय' अशा जयघोषात आज कोल्हापूर शहर आणि परिसरात राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या तर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीची रत्नजडीत खडी पूजा बांधण्यात आली. मंदिर आकर्षक फुले व विविधरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघाले असून दिवसभर भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दख्खनचा राजा श्री जोतिबाची राम अवतारात सालंकृत पूजा बांधण्यात आली तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि विविध हिंदूत्ववादी संघटनांतर्फेही आरती, शंखनाद, कारसेवकांचा सत्कार आदी उपक्रम झाले.