व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमधून कोरोनाला हरवून बाहेर पडणाऱ्या मातेच्या तेरा दिवसाच्या बाळाचा आज व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये नामकरण सोहळा झाला. शुभ्रा म्हणजेच शुभ्रसेना असे या बालिकेचे नामकरण झाले. दसरा चौकातील जैन बोर्डिंग परिसरातील कोविड सेंटरच्या आवारातच हा सोहळा सजला. दरम्यान, पारंपरिक पद्धतीने सर्व विधी झाले. "छोटीशी प्यारीशी नन्हीसी आई कोई परी...' अशा गीतांनी सारा माहौल संमोहित झाला.
तेरा दिवसापूर्वी बाळाला जन्म दिलेल्या या मातेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर अनेक खासगी दवाखान्यात दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. या मातेला व्हाईट आर्मीचा आधार मिळाला. मातेला कोरोनामुक्त करणे आणि बाळाला कोरोनापासून लांब ठेवण्याचे आव्हान या टीमने स्वीकारले आणि व्हाईट आर्मीच्या टीमसोबत मेडिकल असोसिएशन आणि डॉ. आबासाहेब शिर्के यांनी घेतलेल्या परिश्रमानंतर ही माता कोरोनामुक्त झाली. आज ती आपल्या मुलीसह घरी परतण्यापूर्वी मुलीच्या नामकरणाचा सोहळा येथेच करण्याचा निर्णय झाला आणि दिवसभर सारे कोविड सेंटर सर्व सुरक्षिततेचे नियम पाळत या सोहळ्याच्या तयारीत मग्न झाले. दुपारी चारच्या सुमारास हा सोहळा सजला. "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या' म्हणत आणि कानात "कुर्रर्र' असा आवाज करत कोणी आत्याची भूमिका बजावली तर या सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या महिलाही खास उपस्थित होत्या. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आणि परिवाराने या मातेला साडी चोळीचा आहेर आणि बाळाच्या पायात चांदीचे वळे घालून परंपरा जपली. त्यानंतर उपस्थितांनी शुभ्रसेनाला आणि तिच्या आईला शुभेच्छा दिल्या.