मुंबई : यंदाच्या लालबागचा राजा विसर्जन सोहळ्यात एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळालं. उद्योगपती आणि मंडळाचं मानद सल्लागार सदस्य अनंत अंबानी यांनी गिरगाव चौपाटीवर थेट कार्यकर्त्यांसोबत ढोल-ताशांच्या गजरात डान्स करत ठेका धरला. अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्यासाठी अथांग जनसागर उसळला होता. अरबी समुद्रात विसर्जनासाठी तयार केलेल्या विशेष तराफ्यावर अनंत अंबानी सुरुवातीपासून उपस्थित होते. बाप्पाचा निरोप घेताना भावूक झालेल्या वातावरणात अचानक ढोल-ताशांचा कडकडाट झाला. यावेळी स्वतःला रोखू न शकल्यानं अनंत अंबानी कार्यकर्त्यांमध्ये सामील झालं आणि त्यांनी उत्साहात डान्स केला. विसर्जनाच्या अंतिम क्षणी त्यांनी "पुढच्या वर्षी लवकर या" अशी लाडक्या बाप्पाला प्रेमळ साद घातली. अनंत अंबानी यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यांच्या साधेपणाचं आणि बाप्पावरील श्रद्धेचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.