शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येत असलेल्या तीन दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची (Sai Baba 108th Punyatith) सोमवारी गोपालकाल्याच्या कीर्तनानं दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. साईबाबा संस्थानच्या वतीनं 108 वा साईबाबा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या तीन दिवसांच्या उत्सवात लाखो भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिरात परंपरागत गुरुपौर्णिमा, रामनवमी आणि विजयादशमी असे तीन उत्सव साजरे होतात. त्यापैकी एक म्हणजे साईबाबा पुण्यतिथी अर्थात दसऱ्याचा उत्सव होय. 19 ऑक्टोबरच्या पहाटे काकड आरतीनं सुरू झालेल्या या तीन दिवसीय उत्सवाची 20 ऑक्टोबर रोजी आकर्षक फुलांनी सजवलेली दहीहंडी (Dahi Handi) फोडून सांगता करण्यात आली.