कोल्हापूर - हेमाडपंथी बांधकाम शैलीचा अद्भुत नमुना असलेल्या आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात 9 नोव्हेंबरपासून दक्षिणायणातील तीन दिवसांच्या किरणोत्सवास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मावळत्या सूर्याच्या किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला होता सूर्याची मावळती किरणे दुसऱ्या दिवशी देवीच्या कमरेपर्यंत आणि आज तिसऱ्या दिवशी किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली आणि लुप्त झाली. उद्या किरणांची तीव्रता आणि वातावरण असंच राहिल्यास किरणोत्सव सोहळा पूर्ण होईल असा विश्वास किरणोत्सव अभ्यासक डॉ. प्राध्यापक मिलिंद करजकर यांनी व्यक्त केला. किरणोत्सव मार्गात येणारे अडथळे गेली दोन दिवस अभ्यासक आणि भाविक भक्तांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार मावळतीची सूर्यकिरणं मंदिरात पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या पुढाकाराने काढण्यात आली. या मार्गात असणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि आजूबाजूचे अडथळे देवस्थान समितीने हटवले. यामुळे किरणांची तीव्रता गाभाऱ्यापर्यंत चांगली राहिली होती आता उद्या वातावरण असंच राहिल्यास किरणोत्सव सोहळा पूर्ण होण्याची शक्यता आहे.