रायगड - मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील नादुरुस्त आणि धोकादायक पुलाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. नागोठणे येथील नादुरुस्त पुलाला ‘पोट आले’ अशी उपमा देत चक्क या पुलावर डोहाळ जेवण आंदोलन केले.पाळणा, ओटीचे साहित्य आणि डोहाळ जेवणासाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पुलाच्या दुरवस्थेबाबत सरकारचा निषेध करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत नागोठणे येथील या पुलाची झालेली दुरवस्था वाहनचालक आणि प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला.पुलाच्या दुरुस्ती आणि कामामध्ये झालेल्या दिरंगाईला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि दोषी अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.डोहाळ जेवण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर उपरोधिक टीका करत राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. पुलाची दुरवस्था तातडीने दूर करून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
Comments