मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासूनच विविध विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांची गर्दी वाढली. पारंपरिक पद्धतीनं गणरायाला निरोप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई महापालिकेकडून नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणा काम करत आहेत. मुंबईतील विविध विसर्जन स्थळांवर प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे, 'सार्वजनिक' गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत पारंपरिक पूजा आणि आरती झाल्यानंतर, अनेक प्रमुख मंडळांच्या विसर्जन मिरवणुका उत्साही जयघोष, पारंपरिक वाद्यवृंद आणि गुलाल आणि फुलांच्या उधळणीसह सुरू झाल्यचं दिसून आलं. आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी अनेक गणेशभक्त गिरगाव चौपाटीचा परिसरात उत्साहानं एकत्र आले. अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर गणपती बाप्पाचा जयघोष आणि निरोप देताना दाटून आलेले अश्रू दिसून आले.