मुंबई : प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’ आज (29 सप्टेंबर) रोजी विसर्जनासाठी रवाना झाला आहे. दरवर्षी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंधेरीच्या राजाचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. यंदा संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ती ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे.अंधेरीचा राजा हा आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विराजमान केला जातो. या मंडळाची स्थापना 1966 मध्ये झाली. लालबाग-परळ परिसरातून अंधेरीत स्थलांतरित झालेल्या कामगारांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.मंडळाच्या इतिहासानुसार, कामगारांच्या औद्योगिक संघर्षाच्या काळात परिस्थिती सुधारावी, यासाठी गणपतीला नवस करण्यात आला होता. अडचणी दूर झाल्यानंतर पुढील संकष्टी चतुर्थीपर्यंत गणपतीची पूजा सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर हीच परंपरा कायम राहिली.याच परंपरेमुळे अंधेरीचा राजा ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. गणेशोत्सवातील अन्य गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरही अंधेरीच्या राजाचे विसर्जन संकष्टी चतुर्थीला केलं जातं. आज अंधेरीचा राजा मंडपातून विसर्जनासाठी बाहेर पडला असून, भव्य मिरवणुकीतून मूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात येणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या या विसर्जनामुळे अंधेरीच्या राजाच्या मिरवणुकीकडे गणेशभक्तांचे विशेष लक्ष लागलं आहे.