पुणे - भारतीय हवाई दलाच्या, आपले सैन्यदल जाणून घ्या या मोहिमेअंतर्गत एअर फोर्स स्टेशन लोहगावच्या वतीनं पुण्यात भव्य हवाई प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सुमारे 20 हजार प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये प्रामुख्याने शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘आकाश गंगा’ पथकाचे अचूक पॅराशूटद्वारे स्कायडायव्हिंग प्रात्यक्षिक. याशिवाय Su-30 MKI विमानांच्या कमी उंचीवरील चित्तथरारक कसरती, चेतक हेलिकॉप्टरचे फ्लायपास्ट तसंच ‘सूर्य किरण’ आणि ‘सारंग’ या हवाई प्रात्यक्षिक पथकांनी सादर केलेली नेत्रदीपक हवाई कवायत यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता आणि सामर्थ्य नागरिकांसमोर प्रदर्शित करणे तसंच तरुणांना भारतीय हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.यावेळी हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
Comments